Thursday, 5 May 2016

हिंदू कोड बिल..

२४ फेब्रुवारी १९४९ रोजी डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाविषयी जाणून घेऊया...
स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून बाबासाहेबांची इच्छा होती की तमाम स्त्रियांना या जाचक रूढी आणि परंपरा मधून मुक्त करावे आणि ते आपले कर्तव्य आहे असे समजून त्यांनी हिंदू कोड बिल बनवायला घेतले.१९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस बाबासाहेबांनी अविरत कष्ट करून हिंदू कोड बिल तयार केले होते आणि २४ फेब्रुवारी १९४९ रोजी संसदेत मांडले.स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पाहिले. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते.
हे सात घटक खालीलप्रमाणे-
१. जी व्यक्ती मृत्युपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या (स्त्री आणि पुरुष दोघांच्याही) मालमत्तेच्या हक्कांबाबत.
२. मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार
३. पोटगी
४. विवाह
५ . घटस्फोट
६. दत्तकविधान
७. अज्ञानत्व व पालकत्व.
हे सातही विषय स्त्रियांच्या दृष्टीने किती
महत्त्वाचे आहेत हे वेगळे सांगायला नकोच !

भारतीय संविधान परिषदेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदाभेद करणार नाही, न्यायाच्या तराजूत सर्वांना एकाच मापात तोलले जाईल, अशी घोषणा करून स्वातंत्र्य व समता या तत्त्वांचा अंगीकार केलेला होता. या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्याचे न्याय्य हक्क देण्यास विरोध झाला, हे अतिशय दुर्दैवी होते. या बिलातील घटस्फोट, द्विभार्या या कलमांना सनातनी ब्राह्मण मनोवृत्तीच्या विरोधकांनी प्रचंड विरोध केला.या बिलाद्वारे बाबासाहेबांनी एक-विवाह पद्धतीला कायदेशीर मान्यता, स्त्रियांना संपती मध्ये समान वाटा आणि सर्व कायदेशीर बाबींमध्ये समान संधीची तरतूद केली होती परंतु कडवे हिंदू (ब्राह्मण) नेते आणि विचारवंत यांना स्त्रियांना समान अधिकार देण्याची तयारी नव्हती."हिंदू धर्मावरील आक्रमण" अशा प्रतिक्रिया देऊन अशा नेत्यांनी प्रखर विरोध केला होता.

स्वतःला उदार मतवादी आणि पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या राजेंद्र प्रसाद, वल्लभ पटेल आणि मदन मोहन मालवीय यांनी त्यांचे खरे रूप दाखवून बाबासाहेबांना पराकोटीचा विरोध केला होता. ज्या स्त्रीयांसाठी बाबासाहेब इतकी मेहनत घेत होते ते बिल पारित होऊ नये म्हणून सरोजिनी नायडू उपोषण करणार होत्या. एक अस्पृश्य व्यक्ती हिंदू धर्मावर भाष्य करतोय म्हणून बऱ्याच तथाकथित हिंदू म्हणवणाऱ्यानी (ब्राह्मणांनी ) बाबासाहेबंविषयी घृणास्पद प्रतिक्रिया दिल्या होत्या इतकेच काय बाबासाहेबांविरुद्ध देशद्रोही,(म्हणजे विरोधी मत असणाऱयांना देशद्रोही म्हणण्याचे तेव्हापासून चालू आले आहे तर!) हिंदू धर्माचा शत्रू अशा घोषणा देत मोर्चे काढले होते. सामाजिक एकता आणि बांधिलकी धाब्यावर बसवून कॉंग्रेसच्या मदतीने एक अस्पृश्य व्यक्तीमुळे  "हिंदू खतरेमे" असे नाक्राश्रू हे हिंदू धर्माचे ठेकेदार काढत होते.तत्कालीन प्रधानमंत्री सामाजिक दबावाचे राजकारण करण्यात यशस्वी झाले आणि हे बिल संसदेतून बरखास्त करण्यात आले. बाबासाहेबांनी त्या वेळच्या असलेल्या प्रबुद्ध वर्गातील लोकांना / प्रसार माध्यमाना या बिलाच्या पाठी उभे राहण्यास आवाहन केले, परंतु बाबासाहेबांच्या पाठीशी भक्कमपणे कुणी उभे राहू शकले नाही. समाजातील समानतेचे सकारात्म बदल करण्याची बाबासाहेबांची इच्छा मातीमोल ठरली होती. प्रधानमंत्री नेहरुंच्या या कृत्याची बाबासाहेबांना चीड आली आणि दु:खही झाले आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता.... केवढे ते निस्वार्थी कार्य! केवढी ती महानता होती!! आणि किती ते धैर्य!!!म्हणूनच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे धाडस दाखवले.

पण बाबासाहेबांचे कष्ट निरर्थक ठरले नाहीत.
ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला
होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला.हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चारही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. १९५५-५६ मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे म्हणजे-
१) हिंदू विवाह कायदा.
२) हिंदू वारसाहक्क कायदा
३) हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा
४) हिंदू दत्तक व पोटगी कायदा.
हे कायदे मंजूर होणे म्हणजे कायद्याच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होय.या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री-पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली.

बाबासाहेबांशी वैचारिक मतभेद असलेले आचार्य अत्रे म्हणतात, आंबेडकरांचे ‘हिंदू कोड बिल’ जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भांग्य हिंदुसमाजाचे! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करुन घेतला. राजकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदु समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वतःचा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीनदीन अनुयायांचा उध्दार करण्यासाठी त्यांना मानवजातीला संमतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक भगवान बुध्दाला शरण जाण्यांवाचून गत्यंतर उरले नाही.- आचार्य अत्रे.

स्त्रियांना परंपरागत गुलामगिरीतून काढून तिला स्वातंत्र्य देण्याचे व तिचे उध्दार करण्याचे कार्य भगवान बुध्द, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांनी केले आहे. त्यांनी जे स्त्री मुक्तीसाठी कार्य केले त्याला भारतीय इतिहासात तोड नाही.काळ जसजसा पुढे सरकेल, येणारी पिढी प्राचिन भारतातील गुलाम स्त्री व आधुनिक भारतातील स्वतंत्र्य स्त्री यांचा तुलनात्मक अभ्यास करेल, तेव्हा संपुर्ण देश फुले-आंबेडकरांच्या स्त्री मुक्तीच्या कार्यापुढे झुकल्याशिवाय राहणार नाही. (^m^) (^j^) (मनोगते)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment