Thursday, 10 March 2016

तुम्ही मरताय हळूहळू!

तुम्ही मरताय हळूहळू!

तुम्ही प्रवासाला नाही जात, भटकत नाही.
तुम्ही वाचतच नाही काही,
जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर,
चुकून कधी नाही देत, तुम्ही स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू!

स्वत:चं मन मारून, तडजोड करून जगता तुम्ही.
मायेनं कुणी मदत करायला येतं, तर ते ही नाकारता तुम्ही.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू!

सवयीेंचे गुलाम बनता आहात तुम्ही,
रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताय तुम्ही,
चुकून कधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत नाही,
चुकून कधी वाट चुकत नाही,
परक्या अनोळखी माणसांना भेटत नाही,
त्यांच्याशी काही बोलत नाही,
अंगावर चढवत नाही, नवेकोरे पूर्वी न वापरलेले रंग.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू!

छातीत धडधडतच नाही तुमच्या,
तुमचं पॅशन काय हेच आता आठवत नाही तुम्हाला,
भावनांचा अतिरेकी कल्लोळ नाही जाणवत आतल्या आत,
नाही तुटत पोटात, नाहीच येत पाणी डोळ्यात.
याचा अर्थ तुम्ही मरताय, हळूहळू!

या कामात मन रमत नाही, असं वाटतं;
तरीही तुम्ही चिकटून बसता त्याच नोकरीला.
नाही पटत ‘त्या’ व्यक्तीशी तरी,
संपलंय प्रेम हे माहितीये तरी,
तुम्ही रेटत बसता ते नातं,
आयुष्य बदलण्याचा धोकाच नको म्हणता,
सोडत नाही चाकोरी,
झपाटून झोकून देत नाही स्वत:च्या स्वप्नांसाठी स्वत:ला,
तोलूनमापून सुरक्षित जगण्याचे सल्ले झुगारून देत,
एक संधीही देत नाही स्वत:ला,
स्वत:साठी जगण्याची.
आयुष्यच बदलून टाकण्याची.
याचा अर्थ तुम्ही मरताय, हळूहळू!

1 comment:

  1. bet365 bet365 betway login betway login 온라인카지노 온라인카지노 카지노 카지노 happyluke happyluke 메리트카지노 메리트카지노 m88 m88 matchpoint matchpoint 887

    ReplyDelete