।।डिजिटल इंडिया।।
तुमच्या डिजिटल इंडियात
थोडा 'भारत' ही नटवा
अन् मोदी साहेब
तुमचा कँमेरेवाला
आमच्या रानात ही पाठवा..।।
उजाड झालेल्या रानाचं ही
काढा जरा फोटू
तुमच्या कँमे-यापुढं आम्ही
थोडं डिजिटल तरी वाटू
काहीच नसलं करायचं तरी
नुसतं 'सोंग' तरी चांगलं वटवा..
अन् मोदी साहेब
तुमचा कँमेरेवाला
आमच्या रानात ही पाठवा..।।
तुमचं विमान जेवढं उंच जावं
तेवढं खोल गेलयं पाणी
शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रु
पुसेल का हो कोणी?
त्या डिजिटल इंडियावाल्यांना
जरा 'कृषी'चा धडा ही रटवा...
अन् मोदी साहेब
तुमचा कँमेरेवाला
आमच्या रानात ही पाठवा..।।
आम्हाला नको नोटा
पण परदेशात गळ्यात पडता
तसं शेतकऱ्यालाही येवून भेटा
आणि शेतकऱ्याच्या हाती द्या
त्याच्या कष्टाचा खरा वाटा
पण 'इंडिया' जगायच्या नादात जर
माझा 'भारत' मरत असेल तर
आता नव्या क्रांतीची मशाल पेटवा
अन् मोदी साहेब
तुमचा कँमेरेवाला
आमच्या रानात ही पाठवा..।।
तुमच्या म्हणण्यानुसार सारं कसं
डिजिटल अन् चकाचक होईल
पण भाकरीचा एक तुकडा
तुमचा कोणता काँम्प्युटर देईल?
त्याच तुकड्याच्या पोशिंद्यासाठी
तुमच्या बँकेत
दुष्काळी कर्जमुक्तीचा चेक वटवा..
अन् मोदी साहेब
तुमचा कँमेरेवाला
आमच्या रानात ही पाठवा..।।
कवी - अज्ञात
No comments:
Post a Comment